| रायगड | प्रमोद जाधव |
नवी आशा, नवे संकल्प आणि एक वेगळा उत्साह घेऊन बुधवारी (दि.31) रात्री बारानंतर 2026 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, हॅप्पी न्यू इअरचा एकच जल्लोष यावेळी ठिकठिकाणी पहावयास मिळाला. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनारी हजारो पर्यटक, स्थानिक तसेच ग्रामीण भागात मोकळ्या मैदानात नागरिक जमून एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत होते. सोशल मिडीयावर तर शुभेच्छांचा वर्षाव एकमेकांवर करीत महोत्सव
साजरा केला.
सरत्या 2025 या वर्षाला निरोप देत असताना रात्री बारानंतर नव्या 2026 या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अलिबाग, काशीद, वरसोली, मूरूड, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यांसह मोकळ्या मैदानात पर्यटक व स्थानिकांची गर्दी झाली होती. थंडीचा कडाका असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रममाण झाले होते. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत सोहळा अशा अनेक प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी राबविण्यात आले. बुधवारी (दि. 31) सायंकाळी सात वाजल्यापासून त्याची तयारी सुरू झाली.घड्याळ्याच्या काट्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. रात्री उशीरापर्यंत पार्ट्यांनी समुद्रकिनारे, हॉटेल गजबजून गेले होते. तरुण असो, की वृध्द सर्वजण पार्टीमध्ये सहभागी झाले होते.
लहान मुलांसाठी देखील वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेहोते. त्यामध्ये देखील मुलांनी सहभाग घेऊन सरत्या वर्षाला आनंदोमय वातावरण निरोप दिला. थर्टी फर्स्टची तयारी सकाळपासून सुरु होती. चिकन, मटण, तसेच सागरी मासळीवर ताव मारण्यावर अनेकांनी भर दिला. नव वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी नाईट पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये एक दिवसीय दारु विक्रीसाठी 46 जणांना परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला. समुद्रकिनाऱ्यांमध्ये एकत्र जमून डिजेच्या तालावर नाचण्यावर अनेकांनी पसंती दर्शविली होती. त्यामुळे संपूर्ण किनारे पर्यटकांनी भरगच्च भरले होते. बाराचा ठोका झाल्यावर हॅप्पी न्यु इअरचा जल्लोष करण्यात आला. रंगबेरंगी फटक्यांनी आकाश उजळून निघाले. प्रत्येकजण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत होता. दरम्यान हा महोत्सव साजरा करीत असताना कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली होती. प्रत्येकाच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून होते.
ग्रामीण भागात पोपटीवर भर
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांना भर दिली असताना, ग्रामीण भागातही तो क्रेझ दिसून आला. यावेळी अनेक गावांतील तरुणांसह पर्यटकांनी एकत्र येत पोपटीवर ताव मारण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून आला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी दाखल झालेल्या पर्यटकांसह स्थानिकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांनी रात्रीचा दिवस करून पहारा ठेवला. वर्षपूर्ती निमित्त रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज होते. जिल्ह्यामध्ये एक हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी नाका बंदी करून गैरप्रकार व अवैद्य धंद्यांवर पोलिसांची करडी नजर होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.







