| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर दांडी मारण्याचे प्रकार घडत आहेत. प्रशिक्षणाचे दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर सुमारे 2,300 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 574 सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास गैरहजेरी लावल्याची माहिती समोर आली असून, यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.
निवडणूक प्रक्रिया सूरळीत पार पडण्यासाठी पनवेल महापालिकेने निवडणुकीत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केले होते. सोमवार व मंगळवारी 2,294 कर्मचाऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणात तब्बल 574 कर्मचारी व अधिकारी गैरहजर राहिले. महापालिकेला एकूण 4,205 कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी प्रशिक्षित करायचे आहे. गैरहजर राहणाऱ्यांपैकी केवळ 20 ते 22 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहण्यात अडचणी असल्याबाबत लेखी अर्ज महापालिकेकडे सादर केले आहेत. दांडी मारणाऱ्या उर्वरित कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण किंवा सबब निवडणूक विभागाकडे सादर केलेले नसल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांनी यांनी दिली.
त्यामुळे प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील 24 तासांत गैरहजेरीचे कारण स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशांचे पालन न केल्यास संबंधितांवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही निवडणूक अधिकारी चितळे यांनी दिला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचे सिद्ध झाल्यास निलंबनाची कारवाई सुद्धा करण्याचे अधिकार शासनाला आहेत.






