| महाड | प्रतिनिधी |
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेता यावीत, उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी व्हावी तसेच पाळीव जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील शिवथर गावाजवळ काळ नदीवर सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र, अवघ्या एका वर्षातच या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. बंधाऱ्यात पाणी साठत नसून संपूर्ण प्रकल्पच अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे. राज्य शासनाच्या ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत हा बंधारा उभारण्यात आला होता. मात्र, लाखो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बंधाऱ्यात पाणी टिकत नसल्यामुळे उन्हाळी शेती, भाजीपाला उत्पादन आणि पाणी साठवणुकीचा उद्देश पूर्णपणे फसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याच ठिकाणी पावसाळ्यात 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने नदीचा प्रवाह थेट शेतात घुसला. त्यामुळे भाऊ परशुराम साळुंखे या शेतकऱ्याची शेती पूर्णपणे नापीक झाली. या नुकसानाबाबत त्यांनी माणगाव येथील जलसंधारण उपविभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. तसेच बंधाऱ्याचे अपूर्ण कामही आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही. ठेकेदाराच्या कामावर योग्य देखरेख न झाल्यामुळेच बंधाऱ्याला गळती लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या या बंधाऱ्याचा ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होत नसल्याने शासनाचा ‘पाणी आडवापाणी जिरवा’ उपक्रम केवळ कागदावरच राहिला असल्याचे चित्र शिवथर गावात स्पष्टपणे दिसून येत आहे.







