गतिरोधकांअभावी अपघातांचा धोका
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील न्हावे ते न्हावे खाडी दरम्यानचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता एप्रिल महिन्यापासून उखडून त्या ठिकाणी काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होऊनही आजतागायत एकही गतिरोधक (स्पीड ब्रेकर) न बसविण्यात आल्याने हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परिणामी या मार्गावरून न्हावे ओएनजीसीकडे जाणारी जड वाहने तसेच न्हावा-माणिक टोककडे जाणारी पर्यटकांची वाहने मोठ्या वेगाने धावत असून, अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे.
या रस्त्यालगत अनेक घरे, दुकाने आणि वस्ती असून लहान मुले, शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक याच रस्त्यावरून दररोज ये-जा करतात. पूर्वी या मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक होते. मात्र, काँक्रीटीकरणानंतर ते पुन्हा बसवले गेले नाहीत. चकचकीत रस्त्यामुळे वाहनचालक वेगाने वाहन चालवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते वैभव राघो म्हात्रे यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल (भिंगारी) येथील कार्यकारी अभियंता संदीप आर. चव्हाण यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. त्या अर्जात रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गडगडाटी पट्टे (रंबलर्स), थर्मोप्लास्टिक रंगाच्या पट्ट्या, गतिरोधक, परावर्तक हायलाइटर आणि दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून लेखी आदेश देऊनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. हा रस्ता ओएनजीसीसारख्या संवेदनशील भागाकडे जाणारा असल्याने येथे जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अपघात होण्याआधी प्रशासन हालचाल करणार की नेहमीप्रमाणे दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले जाणार, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
तक्रारदारांच्या प्रमुख मागण्या
न्हावे व न्हावे खाडी दरम्यान योग्य अंतरावर गतिरोधक बसवावेत.
गतिरोधकांवर हायलाइटर व थर्मोप्लास्टिक रंगाचे पट्टे मारावेत.
रस्त्याच्या कडेला स्पष्ट दिशादर्शक व सूचना फलक उभारावेत.
कामास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी.





