| पुणे | प्रतिनिधी |
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) मराठी चित्रपट स्पर्धा विभागात सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यात रमेश मोरे दिग्दर्शित आदिशेष, मोहित टाकळकर दिग्दर्शित तो, ती आणि फुजी, जिजीविशा काळे दिग्दर्शित तिघी, रवींद्र जाधव दिग्दर्शित जीव, संतोष डावखर दिग्दर्शित गोंधळ, मनोज नाईकसाटम दिग्दर्शित गमन, समीर तिवारी दिग्दर्शित बाप्या या चित्रपटांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार अमर हलदीपूर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी या बाबतची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यावेळी पुणे फिल्म फाऊंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे, अदिती अक्कलकोटकर उपस्थित होते. पुणे फिल्म फाऊंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्यातर्फे 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 22 जानेवारी या कालावधीत होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन 15 जानेवारीला सायंकाळी ई-स्क्वेअर चित्रपटगृह येथे, समारोप व पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे






