वर्षभरात 93 कोटी 45 लाखांचा ऐवज जप्त
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जुगार, मटक्यासह अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ठिकाणी रायगड पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यांमध्ये 93 कोटी 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रायगड पोलिसांची ही कारवाई समाधानकारक असली, तरी काही मंडळी छुप्या पद्धतीने हे धंदे चालवित आहेत. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या दणक्याने अवैध धंद्यांचे धाबे दणाणून गेले आहेत. रायगड पोलिसांची वर्षभरातील कामगिरी समाधानकारक असली तरी जिल्ह्यातील अनेक भागात छुप्या पद्धतीने अवैध धंदे चालविले जात असल्याची तक्रारी आहेत.
रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी नशा येणारे तसेच अन्य अंमली पदार्थ विक्री, वाहतूक व निर्मितीत वाढ होत आहे. तसेच जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने काही मंडळी मटका, जुगारासारखे अवैध धंदे चालवित असल्याचे तपासातून समोर आले आहे. या व्यवसायामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. काही मंडळी नशा येण्यासाठी अंमली पदार्थांचा वापर करतात. तर, व्यायामशाळेतील काही तरुण मंडळी नशा येणारे इंजेक्शनचा वापर करीत असून, मटका व जुगारसारखे अवैध धंदे राजरोसपणे चालवित असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार जुगार, मटका चालविणाऱ्यांसह गांजा चरस, केटामाईनसारखे अंमली पदार्थ विकणारे, बाळगणाऱ्यांविरोधात रायगड पोलिसांनी कारवाई केली. वर्षभरात 140 ठिकाणी वेगवेगळे छापे टाकण्यात आले. या कारवाईत 93 कोटी 45 लाख 78 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 123.768 किलो वजनाचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला.
त्यात 23.890 किलो ग्रॅम वजन असलेला एक कोटी 19 लाख 45 हजार रुपयांचे चरस, 44.431 किलो ग्रॅम वजन असलेला 11 लाख 32 हजार 775 रुपयांचा चरस, 4.76 किलो ग्रॅम वजन असलेला चार कोटी 22 लाख 76 हजार रुपयांचे एम.डी. अंमली पदार्थ तसेच 50.687 किलो ग्रॅम वजन असलेला 88 कोटी 92 लाख 25 हजार रुपये किमतीचा केटामाईनचा साठा जप्त करण्यात यश आले आहे. तसेच मटका जुगाराचा धंदा करणाऱ्यांवर छापे टाकून 56 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अंमली पदार्थांच्या 26, तर मटका जुगारच्या 115 कारवाया झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. या कारवाईनंतर जिल्ह्यात अंमली पदार्थांसह मटका जुगारासारख्या अवैध धंद्यांनी विळखा घातल्याचे दिसून येत आहे. रायगड पोलिसांनी कारवाई समाधानकारक असली, तरी जिल्ह्यातील अनेक भागात छुप्या पद्धतीने अवैध धंदे चालविले जात असल्याची तक्रारी आहेत. काही ठिकाणी मटका जुगारासारखे धंदे ऑनलाईन चालविले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
अवैध दारु विक्रेत्यांना दणका
रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध दारु विक्री, वाहतूक व निर्मिती केली जाते. यावर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलिसांनी 2025 या वर्षात कंबर कसली आहे. अवैधरित्या दारु विक्री, वाहतूक व निर्मिती करणाऱ्यांविरोधात 625 कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 84 लाख 55 हजार 585 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईतून अवैध दारु विक्रेत्यांना दणका देण्यात आला आहे.
गावगुंडांविरोधात कारवाई
सण, उत्सव व निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या जिल्ह्यातील गावगुंडांविरोधात रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 व 57 अन्वये 14 जणांना तडीपार करण्यात आले असून, 11 जणांना तडीपार करण्याची हालचाल सुरु आहे. दहा हजार 519 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना दणका दिला आहे.
रायगड पोलीस दलाच्या हद्दीतील अवैध धंद्याविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दहा हजारांहून अधिक जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, 14 जणांना तडीपार केले आहे. अन्य मंडळींविरोधात तडीपारची प्रक्रिया सुरु आहे.
– आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड







