| चिरनेर | प्रतिनिधी |
देशाचे राजकारण सध्या चुकीच्या दिशेने सुरू असून, संविधानावर घाला घातला जात आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी केले. अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव राजाभाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 9) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाभाऊ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “दिवंगत मधुकर ठाकूर कधीही टक्केवारीत अडकले नाहीत. त्यांच्यात नम्रता आणि जनतेशी नातं जपण्याची वृत्ती होती. त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी राजाभाऊ निश्चितच योग्य आहेत. मात्र, राजकीय निर्णय हा येथील जनता आणि ठाकूर कुटुंबाने घ्यायचा आहे.” निवडणुकीत कुठलाही दगाफटका होणार नाही, याची जबाबदारी महाविकास आघाडीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना महेंद्र घरत म्हणाले, “मधुकर ठाकूर यांचे कार्य अलिबाग परिसराला परिचित आहे. समाजसेवा हाच त्यांच्या कुटुंबाचा पिंड आहे. त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांनी जिल्हा परिषदेतून राजकीय श्रीगणेशा करावा. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ ठाकूरच असतील,” असे त्यांनी जाहीर केले.
सत्काराला उत्तर देताना राजाभाऊ ठाकूर म्हणाले, “पप्पांचे काम अलिबागच्या जनतेला माहिती आहे. त्यांनी स्वीकारलेला सामाजिक वसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दिबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेच पाहिजे, यासाठी रस्त्यावर उतरायलाही आम्ही तयार आहोत. अलिबागच्या वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी संघर्ष करू.” ठाकूर कुटुंबावर जनतेने कायम प्रेम केले असून, पुढेही भक्कम साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास सुनील थळे, समीर ठाकूर, प्रशांत नाईक, आल्हाद पाटील, सुनील घरत, रवींद्र ठाकूर, भास्कर चव्हाण, आकाश राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







