शुभम आंबवणे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
| कर्जत | प्रतिनिधी |
देशासाठी काही तरी केले पाहिजे. या भावनेने मी या क्षेत्रात पडलो. दहावीत पहिला किंवा पहिल्या पाचमध्ये उत्तीर्ण झाला तरच आपण यशस्वी होऊ शकतो असे नाही तर संयम आणि आत्मविश्वास असेल तर यश आपल्या जवळ येते. काहीही झाले तरी आपले आई-वडील, गुरुजन आणि आपल्या शाळेला कधीही विसरू नका. कारण त्यांच्यामुळेच आपण आज आहोत. आपल्याला काही झाले तर आपल्याला माता-पित्यांचे हृदय सर्वात आधी हेलावते. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले आहेत. याचे भान नेहमी ठेवा, असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केंद्र सरकारमध्ये उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या शाळेचा माजी विद्यार्थी शुभम आंबवणे यांनी केले.
कर्जत एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त माजी विद्यार्थी शुभम सुनील आंबवणे यांना प्रमुख पाहुणे निमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष अनिरुद्ध जोशी, सचिव प्रवीण गांगल, खजिनदार मदन परमार, सतीश पिंपरे, श्रीकांत मनोरे, साक्षी आंबवणे, मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी, सुनील बोरसे, नगमा नजे, भारती पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिव तांडव, दक्षिणात्य नृत्य, कोळी नृत्य, राजस्थानी लोकनृत्य, साऊथ इंडियन डान्स यांसारखी रंगतदार सादरीकरणे केली. तसेच महाभारतकालीन द्रौपदी वस्त्रहरणाचा देखावा आणि ‘नटसम्राट’ नाटकाचा एक अंक यामुळे प्रेक्षक भारावून गेले. त्यानंतर लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेला रोप मल्लखांब हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. वैष्णवी दगडे, देवराज बोराडे, संस्कार शेलार, आर्यन चव्हाण, अंश जोशी या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक करण्यात आले.
मुख्याध्यपिका चौधरी यांनी, शाळेचा शैक्षणिक आढावा सादर केला.डॉ. जोशी यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत आध्यात्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक उपक्रमांसह विज्ञान प्रदर्शन, नवरात्री उत्सव, विधी कार्यक्रम, आय कॅम्प, आजी-आजोबा कार्यक्रम, महिलांचा सत्कार, मतदान जनजागृती रॅली, रक्तदान शिबीर तसेच स्मरणिका प्रकाशन असे अनेक उपक्रम वर्षभर राबविण्यात आले असे सांगितले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






