226 गडकिल्ल्यांची भटकंती
| कोलाड | विश्वास निकम |
अवलिया शिवप्रेमी कार्तिक सिंग यांनी महाराष्ट्रातील सुमारे 226 शिवकालीन गड किल्ल्यांवर चक्क सायकलवरून प्रवास करत भटकंती केली आहे. दरम्यान, प्रवास करत असताना कोलाड येथील आंबेवाडी नाक्यावर सकल हिंदू समाजातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, त्यांना पुढील सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
शिवभक्त कार्तिक सिंग यांचे शिक्षण बी.ए. झाले आहे. ते हरियाणामध्ये नोकरी करत होते. परंतु, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या अस्मितेची आणि विचारांची प्रेरणा निर्माण झाली. ही प्रेरणा घेऊन त्यांनी 24 डिसेंबर 2024 पासून उत्तराखंड येथून सायकल वारी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची भटकंती सुरू केली. त्यांनी प्रथम छत्रपती शिवरायांच्या जन्म ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक होऊन गडकिल्ले मोहिमेला सुरूवात केली. आता जवळपास त्यांनी 226 गड किल्ल्यांवर सायकलवरून प्रवास करत भटकंती केली आहे. त्यामुळे हा त्यांच्या जीवनातील महत्वाचा क्षण आणि एक आगळा-वेगळा आदर्श आजच्या पिढीसाठी आदर्शच म्हणावा लागेल. या प्रवासादरम्यान, कार्तिक सिंग हे गुरुवारी (दि.8) सायंकाळी कोलाड आंबेवाडी नाक्यावर पोहचले. त्यावेळी त्यांचे सकल हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी कोलाडचे सहाय्यक पोलीस नरेश पाटील, महेशस्वामी जंगम, स्वप्नील विचारे, कामेश देवकर, रोहित शिंदे, अजय लोटणकर, विजय शिंदे, सोहम चौधरी, राजेश कदम, संतोष बाईत, भरत जाधव, उमेश पवार, किशोर सावरकर यांच्यासह सकल हिंदू समाजाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.







