मृतदेह नेण्यासाठी खासगी वाहनांचा वापर
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत श्रीवर्धन तालुक्यासाठी शववाहिनी देण्यात आली आहे. गुरुवार 26 जून रोजी श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात ही शववाहिनी दाखल झाली असून, अद्याप पर्यंत सात महिने झाले तरीही शववाहिनी करीता स्वतंत्र चालकाची नियुक्ती करण्यात आली नाही.
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात शववाहिनी दाखल झाल्यानंतर कित्येक दिवस हे वाहन चालक विना रुग्णालयाच्या कोपऱ्यात उभे केले होते. अनेक गरजू कुटुंबांना मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी अथवा रुग्णालयातून घरी नेण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. अत्यल्प दरात शववाहिनी सेवा उपलब्ध झाल्याने सदरच्या कुटुंबांनी शववाहिनीची मागणी केल्याने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाकडून रूग्णवाहिकेचा चालक शववाहिनी करीता देण्यात येऊ लागला.
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांच्या सेवेसाठी 102 क्रमांकाच्या दोन रूग्णवाहिका उपलब्ध असून काही महिन्यांपूर्वी कंत्राटी चालकाची मुदत संपल्याने या दोन रुग्णवाहिकांची जबाबदारी एकाच चालकावर आहे. अनेकवेळा तालुक्यातील खेडेगावातून एखाद्या रुग्णाला श्रीवर्धन येथे उपचारासाठी दाखल करणे किंवा पुढील उपचारासाठी शहरात नेण्याकरिता रुग्णवाहिकेची गरज भासल्यास ती जबाबदारी एकाच चालकावर पडते.
शववाहिनी दाखल झाल्यापासून नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अडचण आहे ती शववाहिनीवर स्वतंत्र चालकाची नियुक्ती होत नसल्याची. मृत व्यक्तीचे नातलग स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी वेळ ठरवून शववाहिनीची नोंदणी करतात. अनेकदा, उपजिल्हा रुग्णालयातील दोन रूग्णवाहिकेवरील एकमेव चालक रूग्णाला पुढील उपचारासाठी शहरात घेऊन जात असल्याने नियोजित वेळेत शववाहिनी करीता हजर होऊ शकत नसल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांनी शववाहिनी करीता स्वतंत्र चालकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.
चालकाची नियुक्ती कोण करणार
श्रीवर्धन येथे दाखल झालेल्या शववाहिनी वरील चालकाची नियुक्ती जिल्हा शल्य चिकित्सक, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक करणार की बाह्य कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार या बाबतीत खुलासा होणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत शववाहिनीवर चालकाची गरज भासल्यास उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णवाहिकेवरील चालक उपलब्ध करतो. जिल्हा शल्य चिकित्सक येथे चालक संदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे. लवकर कार्यवाही अपेक्षित आहे.
-डॉ. कौस्तुभ केळस्कर
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय.






