आठ तासात महिलांच्या उपोषणाला यश
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भडवल येथील कातकरवाडी, धनगरवाडी येथील रस्त्यासाठी स्थानिक महिलांचे उपोषण सुरू केल्यानंतर उपोषणाला यश आले आहे. या निमित्ताने महिला शक्तीमुळे विजय मिळाला असून, रस्त्याचे काम सुरू करण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राहुल देवांग यांनी दिले. त्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.
नेरळ जवळील भडवळ गावातील धनगरवाडी येथील रहिवासी यांचा धनगरवाडीला मुख्य गावाशी जोडणारा रस्ता आजपर्यंत तयार झालेला नाही. या रस्त्याअभावी आम्हाला दैनंदिन जीवनात अत्यंत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट होते. आजारी रुग्ण, गरोदर महिला, शालेय विद्यार्थी तसेच दुध, शेतीमाल व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे अशक्यप्राय होते याबाबत आम्ही यापूर्वी अनेक वेळा संबंधित कार्यालयात तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, आजता गायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आम्हाला आमचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी 12 जानेवारी रोजी उपोषणाला सुरुवात झाली होती. धनगरवाडी, कातकरवाडी, भडवळ या ठिकाणी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. उपोषण सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ तासात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून धनगरवाडीचा रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष जेसीबी लावून खोदकाम सुरू करण्यात आले. बांधकाम विभागाचे राहुल देवांगे यांनी लेखी निवेदन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. त्यानंतर उपोषणाला बसलेले महिला यांनी रस्त्याचे काम सुरू झाल्याचे पाहून उपोषण स्थगित केले. यावेळी नयना रमेश गोरे, मयुरी शिंगाडे, जयश्री आखाडे, संगीता गोरे, मीना आखाडे, वनिता आखाडे, जयश्री शिंगटे संगीता शिंगटे अशा शिंगाडे, भारती बावदाने, बेबी आखाडे, नेहा आखाडे, रमीबाई गोरे, संगीता गोरे, या महिला उपोषणास ठिकाणी उपस्थित होत्या.






