| माणगाव | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील विद्यार्थी व संशोधकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुलपती कार्यालयाच्या पुढाकारातून चार महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये राज्यस्तरीय आंतर-विद्यापीठ संशोधन स्पर्धा ‘आविष्कार’ ही सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाते. तरुण पिढीत संशोधनाची आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आणि ज्ञानाच्या माध्यमातून समाज व राज्याच्या विकासाला चालना देणे, हे ‘आविष्कार’ योजनेमागील मुख्य उद्दिष्ट आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु कर्नल प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली यंदा ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे विद्यापीठस्तरीय भव्य आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे उत्साहात पार पडले. या स्पर्धेत मानवता, भाषा व ललित कला, शेती व पशुपालन, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, शुद्ध विज्ञान, औषध व औषधनिर्माणशास्त्र अशा विविध विषयांतून महाराष्ट्रातील 48 सर्वोत्कृष्ट संशोधकांची निवड करण्यात आली. यामध्ये पदवीपूर्व 18, पदव्युत्तर 18 आणि पीएच.डी.चे 12 संशोधकांचा समावेश आहे.
कुलगुरु कर्नल प्रा. डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. शेष, अधिष्ठाता डॉ. नलबलवार, अधिष्ठाता डॉ. सरगडे, विविध विषयांचे तज्ज्ञ परीक्षक तसेच राज्यभरातून आलेले 200 हून अधिक संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संशोधन संस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम राज्यातील उच्च शिक्षण व नवसंशोधना साठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.






