। पनवेल । वार्ताहर ।
खारघर परिसरात एका 56 वर्षीय डॉक्टरला पोलीस असल्याची भीती दाखवून चौकडीने तब्बल 13 लाख 25 हजारांची लूट केली. याबाबत सोमवारी (दि. 12) खारघर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सायंकाळी सव्वापाच वाजता सेक्टर 20 येथील कॅनरा बँकेसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. डॉ. मनीष शिवाजी शिंदे (मूळ राहणार सांगली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चार अनोळखी व्यक्तींनी भरलेली मोटार त्यांच्यासमोर आली. त्या मोटारीतून बाहेर पडलेल्या व्यक्तींकडे काट्या आणि डोक्यात पोलिसांची टोपी होती. त्यामुळे डॉक्टर शिंदे यांना हे पोलीस असल्याचा समज झाला. संशयित चार आरोपींनी त्यांना भीती दाखवून त्यांची जबरी लूट केल्याने खारघरमध्ये व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.







