| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीच्या उद्देशाने निवडणुक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे येथे भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. मतदान जनजागृतीसाठी आयोजित या 5 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या उपक्रमात के.एल.ई. कॉलेज कळंबोली, सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेज, कामोठे येथील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मतदानाच्या प्रतिज्ञेने मॅरेथॉनची सुरूवात झाली. ‘माझे मत, माझा अधिकार, लोकशाही मजबूत करूया’ अशा घोषणांसह विद्यार्थ्यांनी धाव घेत नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, जनसंपर्क अधिकारी नितीन साके, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, विविध महाविद्यालयांचे संबधित शिक्षक उपस्थित होते. याचप्रमाणे पिल्लई महाविद्यालयामध्ये देखील मतदान जनजागृतीसाठी नुकतीच वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.
अभिरूप मतदान केंद्राच्या माध्यमातून प्रथम मतदारांना मतदान प्रक्रियेचे धडे
सीकेटी महाविद्यालयामध्ये पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिरूप मतदान केंद्राचा अभिनव उपक्रम पनवेल महानगरपालिकेच्या स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून सोमवारी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाने विद्यार्थी सहभागातून उत्स्फुर्तपणे संपुर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती प्रथम मतदारांना होण्यासाठी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सादरीकरण केले. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून ते अंतिम मतमोजणी, विजयी उमेदवाराची घोषणा या सर्व बाबींचे नाट्यमय सादरीकरण केले. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि उत्साह निर्माण होत आहे.







