। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील अणसुरे या गावात कर्जाच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिची हत्या केली. वासंती वासुदेव सरमळकर (65) असे मृत महिलेचं नाव आहे. तर उमेश वासुदेव सरमळकर (40) असे मुलाचे नाव असून याच्याविरोधात वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या कारणावरून त्याचा आई वासंती सरमळकर यांच्याशी वारंवार वाद होत होता. मंगळवारी (दि.14) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात बसलेल्या होत्या. यावेळी आरोपी उमेश सरमळकर याने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने अंगणात बसलेल्या आईवर गोळी झाडली. यात वासंती सरमळकर यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संशयित आरोपी उमेश याला वेंगुर्ले पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, उमेश हा दारूचा व्यसनी होता. त्याची मानसिक स्थितीही अनेकदा बिघडत असे. या घटनेचा अधिक तपास वेंगुर्ले पोलीस करत आहेत.






