लोकसहभागातून आदर्श परसबाग उभारणी
| महाड | प्रतिनिधी |
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये शालेय परसबाग निर्माण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेमार्फत तालुका व जिल्हास्तरावर आकर्षक पारितोषिकांसह ‘सर्वोत्कृष्ट परसबाग’ स्पर्धा राबविण्यात आली.
शाळेला परसबागेसाठी जागा नाही, माती नाही, पाणी नाही अशा विविध आव्हानांवर मात करत पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम करंजे गावातील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक आदिवासी वाडी शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सावित्री नदी उगम खोऱ्यातील दुर्गम व उंच डोंगराळ भागात वसलेल्या या शाळेत प्रतिकूल परिस्थिती असूनही विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि शिक्षणप्रेमी नागरिकांच्या लोकसहभागातून पाणीपुरवठ्याची सुविधा निर्माण करण्यात आली. प्रारंभी प्रत्येक कुटुंबाकडून ‘माझी कळशी, माझं पाणी’ हा उपक्रम राबवून परसबाग उभारण्यात आली. या परसबागेतून मिळणारा ताजा, सकस व विषमुक्त भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात नियमित वापरला जात असल्याने विद्यार्थ्यांची हजेरी 100 टक्के राहण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे. परसबागेमुळे शाळेचा परिसर अधिक आकर्षक आणि आनंददायी झाल्याची प्रतिक्रिया देखील ग्रामस्थांनी व्यक्त केली. परसबागेच्या माध्यमातून विविध विषयांचा ताळमेळ घालत शिक्षणाशी प्रत्यक्ष जोड निर्माण करणारी नवोन्मेषी व आनंददायी परसबाग शिक्षण पद्धती शाळेत विकसित करण्यात आली आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून यंदा शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. जिल्हा पोषण आहार अधिक्षक श्रीकांत मोरे यांच्या जिल्हा मूल्यांकन समितीने परसबागेसह शाळेच्या विविध उपक्रमांची बारकाईने पाहणी करून समाधानकारक गुण दिल्यानेच हा निकाल लागल्याची माहिती उपशिक्षक अमित देबडवार यांनी दिली. विद्यार्थ्यांचे निसर्गाविषयी मनोरंजनातून समुपदेशन वेळोवेळी करण्यात उपशिक्षक गणेश भोये यांनी हातभार लावल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
या यशाबद्दल शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, सरपंच तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. देवळे सरपंच सुनिता मेस्त्री, तसेच सदस्य व पदाधिकारी, पोलादपूर तालुका गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, कृषी अधिकारी अरुण धिवरे, देवळे केंद्रप्रमुख राजाराम शेलार, माजी केंद्रप्रमुख तुकाराम मोरे तसेच परिसरातील समाजसेवक, पत्रकार आणि स्वदेश फाऊंडेशन व ग्रीन फाऊंडेशन, प्रणिक योगा हिल फाऊंडेशन मुंबई, ग्रामविकास समिती यांसारख्या संस्थांचे विशेष योगदान लाभल्याची भावना शाळेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
कृषीपूरक व्यवसायांचे नियोजन
ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या कचरा संकलन पेटीचा उपयोग व्हावा, पेटी गंजून खराब होऊ नये म्हणून कचरापेटीचा वापर खुराडा म्हणून करत परसबाग बक्षिसाचा विनियोग करत गावातील, शाळेतील ओल्या किचन कचऱ्याचे वेस्ट मॅनेजमेंट व्हावे याकरिता कुक्कुटपालन सुरू केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहारात अंडी उपलब्ध होत असून कृषीपूरक व्यवसायांचे नियोजन, व्यवस्थापन आणि संभाव्य संधींचा प्रत्यक्ष अनुभवही मिळत आहे.
गतवर्षी शाळेला जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला होता. त्यावेळी मिळालेल्या पुरस्कारातून आवश्यक साधनांची खरेदी करून पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न करण्यात आले. शाळा गावातील कचरा व्यवस्थापनातही सक्रिय भूमिका बजावत असून गावातील कचरा ग्रीन फाऊंडेशन या संस्थेमार्फत प्रक्रियेसाठी पाठविण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जनजागृतीमुळे गावात कचऱ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे होत आहे.
-विकास नाडेकर,
मुख्याध्यापक






