भारताला धमकी देणाऱ्या बीसीबी विरोधात आक्रमक; बहिष्काराची भाषा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे. बांगलादेशच्या खेळाडूंनीच आता देशांतर्गत सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक नजमुल इस्लाम यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमामात नाराजी दिसून येत आहे.
आधीच बांगलादेशच्या टी 20 वर्ल्ड कप 2026 मधील सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. त्यात आता हा नवा गोंधळ समोर आला आहे. मात्र नजमुल यांच्या विधानापासून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्वत:ला लांब ठेवले आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला आयपीएल 2026 मधून काढून टाकण्याचे निर्देश बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर बांगलादेशने खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत भारतात टी 20 वर्ल्ड कप 2026 खेळायला जाणार नसल्याचे आयसीसीला कळवले असून ठिकाण बदलण्याची मागणी केली आहे. मात्र आयसीसीने दोनदा ही मागणी फेटाळली आहे. तसेच सध्या बीसीबी आणि आयसीसी यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू आहेत.
अशातच नजमुल यांनी राष्ट्रीय खेळाडूंच्याच वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की काही मोजके खेळाडू त्यांच्यात गुंतवलेल्या पाठिंबा आणि संसाधनांचा योग्य वापर करत नाही. याशिवाय माजी कर्णधार तमिम इक्बालला त्यांनी भारताचा एजंट असंही म्हटलं होतं. तमिमने टी 20 वर्ल्ड कपमधील सहभागाबाबत भावनिक होऊन निर्णय न घेण्याची विनंती बोर्डाला केली होती. त्यानंतर नजमुल यांनी वादग्रस्त भाष्य केले होते. नजमुल यांनी असंही म्हटलं होतं की जरी बांगलादेश टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळले नाही, तरी बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसणार नाही. त्यांच्या या विधानांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
त्यांच्या या विधानांनंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली असून जोपर्यंत नजमुल त्यांच्या पदाचा राजीनामा देत नाहीत किंवा खेळाडूंच्या सन्मानासाठी बोर्डाकडून जोपर्यंत स्पष्ट पावले उचलली जात नाही, तोपर्यंत क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. याशिवाय ज्याप्रकारे टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा मुद्दाही हाताळला जात आहे, त्यावरूनही खेळाडूंमध्ये नाराजी आहे.
आता खेळाडूंच्या या धमकीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की नजमुल यांचे विधान बोर्डाकडून करण्यात आलेले अधिकृत विधान नसून ते त्यांचे वैयक्तिक विधान आहे. बोर्डाच्या निवेदनात म्हटले आहे की बीसीबी नियुक्त प्रवक्त्यांकडून किंवा मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाकडून कोणतेही अधिकृत विधान केले जात नाही, तोपर्यंत कोणत्याही विधानाची जबाबदारी किंवा समर्थन बीसीबी करत नाही. याशिवाय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बांगलादेश क्रिकेटच्या सन्माला ठेच पोहचवणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासनही दिले आहे. त्यांच्या निवेदनात असंही म्हटले आहे की मखेळाडू हे बांगलादेश क्रिकेटचे हृदय आहेत. त्यांचे योगदान आणि कल्याण यालाच सर्वोच्च प्राधान्य असेल.







