| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील वाहतूक समस्या बिकट आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांच्या साथीने प्रयत्न करू. आता जास्त स्पीडच्या नवनवीन गाड्या येत आहेत. विद्यार्थ्यांनो अभ्यास स्पीडने करा, मात्र गाडी हळू चालवा, असा महत्वापूर्ण सल्ला विभागीय परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक जय शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूलच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक जय शेट्ये यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
उद्घाटन समारंभ झाल्यानंतर विभागीय परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक शेट्ये आणि सुराटकर यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्याणी सुराटकर, डॉ. निलोफर खान, डॉ. रुपाली येवले, समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूलचे निलेश मराठे, अभिजीत मराठे आदी याप्रसंगी उपस्थित होते. उप प्राचार्य डॉ. अमोल चांदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कल्याणी सुराटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आसावरी चव्हाण आणि साहिल चौधरी या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रा. विशाल शेळके, प्रा. मुक्ता गोचाटे, प्रा. पूजा डांगर, प्रक्रिती सिंग आदी उपस्थित होते.





