| रायगड | प्रतिनिधी |
भौगोलिक रचनेमुळे रायगड जिल्हा आपत्तीप्रवण म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जिल्ह्यात पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या घटना, चक्रीवादळ, अतिवृष्टी, आगीचे प्रकार तसेच औद्योगिक अपघात यांसारख्या विविध स्वरूपाच्या आपत्ती सातत्याने घडत असतात. जिल्ह्यात आपत्ती निवारणासाठी आवश्यक तेवढे प्रशिक्षित मनुष्यबळ कमी पडत असल्याची बाब अनेकवेळा अधोरेखित झाली आहे. रायगड जिल्ह्यातील निवडक 175 एन.सी.सी. कॅडेट्ससाठी 2 जानेवारीपासून आठ दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर अलिबाग येथील जे. एस. एन. कॉलेज परिसरात यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतीय सेनेच्या माध्यमातून तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. आठ दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील बचाव व मदतकार्य, प्राथमिक उपचार पद्धती, शोध व बचाव कार्य, दोरखंडाच्या साहाय्याने बचाव तंत्र, पाण्यातील बचावकार्य, आग नियंत्रणाच्या उपाययोजना तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याच्या पद्धती यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
यासोबतच आपत्तीच्या प्रसंगी विविध यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधायचा, नेतृत्वगुण कसे विकसित करायचे, शिस्त पाळत मानसिक स्थैर्य कसे राखायचे, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. केवळ सैद्धांतिक माहितीपुरती मर्यादा न ठेवता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर विशेष भर देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तव परिस्थितीत काम करण्याचा अनुभव मिळाला.






