कोट्यवधींचा माल जप्त; खालापूर पोलिसांची धडक कारवाई
। वावोशी | प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडक बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तब्बल 1 कोटी 3 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावरोली टोलनाक्याच्या अलीकडे ही धडक कारवाई करण्यात आली. एमएच-40-डी सी-2265 क्रमांकाच्या कंटेनरमधून अवैधरीत्या 63 लाख 34 हजार 200 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूयुक्त पान मसाला (गुटखा) वाहतूक केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस मदत केंद्र बोरघाट व खालापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सदर कंटेनर अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान कंटेनरचे दोन्ही सील तुटलेले आढळून आले. तसेच चालकाकडे मालाची वैध कागदपत्रे, ई-वे बिल नसून, सादर करण्यात आलेल्या इनव्हॉईसवर कोणतीही सही, शिक्का किंवा पाठवणारा-घेणाऱ्याचा पत्ता नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. यानंतर कंटेनर खालापूर पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या उपस्थितीत हा पंचनामा करण्यात आला. तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शेख रशीद शेख रहमान (वय 40, रा. अकोला), गणेश देविदास वानखेडे (वय 25, रा. अकोला) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा नेमका कोठून आणला, त्याचा मूळ मालक कोण आहे व यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. या कार्यवाही पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील (महामार्ग पोलीस मदत केंद्र बोरघाट), पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस हवालदार बाळा जाधव, दिनेश भोईर, शिवाजी बोडके, संदेश कावजी, दशरथ मोकल, पोलीस शिपाई कृष्णा मुंडे, पुष्पलवार आदी उपस्थित होते.
पोलिसांचे जनतेला आवाहन
अवैध, प्रतिबंधित अमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक किंवा विक्रीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ डायल 112, रायगड दृष्टी व्हॉट्सॲप क्रमांक-7620032931 किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.






