पोलादपूरमध्ये दुबार मतदारांचा धुमाकूळ; निवडणुकीला लोकशाहीचा धोका
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यात तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ‘शहरात मतदान, गावात उमेदवारी’ असा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मुंबई महानगरपालिका व इतर शहरांमध्ये मतदान करून ‘शाई पुसून’ गावाकडे येणारे दुबार मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तहसील कार्यालय पोलादपूर येथे आतापर्यंत 16 मागणी अर्ज दाखल झाले असून, 46 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांत मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आदी शहरांमध्ये वास्तव्यास असलेले दुबार मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
पोलादपूर तालुक्याला ‘चाकरमान्यांचा तालुका’ म्हणून ओळख आहे. मात्र, आता हेच चाकरमानी मतदार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच नव्हे तर विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्येही ‘किंगमेकर’ ठरत आहेत. अनेक गावांमध्ये स्थानिक मतदारांपेक्षा परगावच्या दुबार मतदारांची संख्या अधिक असल्याने निवडणूक निकालाची दिशा तेच ठरवत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, तहसील कार्यालयाने 690 दुबार मतदारांची नावे निश्चित केली आहेत. मात्र, मतदान ओळखपत्राला आधार लिंक नसल्याने दुबार, तिबार अथवा अनेक ठिकाणी नावे असलेले मतदार अद्यापही यंत्रणेच्या रडारबाहेर आहेत. शहरात आणि गावात वेगवेगळ्या तारखांना मतदान होत असल्याचा फायदा घेत हे मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करत असल्याचा आरोप होत आहे.
या दुबार मतदारांना शहरातून गावाकडे आणण्यासाठी ने-आण, जेवण व रोख खर्च केला जात असून, मतामागे हजारो रुपयांचा व्यवहार सुरू असल्याची चर्चा उघडपणे होते आहे. परिणामी, आर्थिक ताकद नसलेले स्थानिक उमेदवार समाजकार्य व पक्ष संघटन करूनही पराभूत होत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांचा प्रश्न लोकशाही प्रक्रियेच्या मुळावर घाव घालणारा ठरत असून, राज्य निवडणूक आयोग यावर ठोस आणि कठोर कारवाई करणार का, असा सवाल पोलादपूर तालुक्यात उपस्थित केला जात आहे.







