| कर्जत | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या गरजेनुरूप संशोधन कार्य सुरू असल्याने देशाच्या अन्न व पोषण सुरक्षेला बळकटी मिळेल, असे प्रशंसोद्गार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेच्या महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल यांनी काढले. येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात कृषी समृद्धी योजनेंतर्गत विविध पिकातील जलद पैदास संरचना उभारण्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. किशोर शिंदे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, कृषी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना थोरात, प्राध्यापक डॉ. प्रीती सोनकांबळे, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रवीण जाधव, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय अमोलिक, प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील, शास्त्रज्ञ डॉ. विष्णू गीते, वरिष्ठ पैदासकार डॉ. गौतम श्यामकुवर व डॉ. मदन वांढरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विजयकुमार चिंचणे, कृषी संशोधन केंद्र कर्जतचे प्रमुख कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर व अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा असूनही शास्त्रज्ञ करीत असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे असल्याने महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांच्या बळकटीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील गतिमान भात पैदास प्रकल्पाप्रमाणे महाराष्ट्रातील राहुरी, अकोला व परभणी येथील कृषी विद्यापीठांतही विविध पिकातील जलद पैदास संरचना प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.






