| माणगाव | प्रतिनिधी |
राष्ट्र सेविका समितीच्या 90व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.18) कोकण प्रांतामध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी एकूण 19 ठिकाणी भव्य सघोष पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत माणगाव येथे भव्य पथसंचलन उत्साहात पार पडले. या पथसंचलनात एकूण 239 सेविका सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये 158 सेविका पूर्ण गणवेशात, 138 सेविका संचलनात चालत, 20 घोष सेविका, तसेच मंगलवेश पथकातील सेविकांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी 60 बंधुगण उपस्थित होते. या शिस्तबद्ध व प्रेरणादायी पथसंचलनास माणगावकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे पथसंचलन साबळे हायस्कूल माणगाव येथून सुरू होऊन संपूर्ण माणगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतून शिस्तबद्ध मार्गक्रमण करत पार पडले. रायगड जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी अत्यंत एकसंध, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी सहभाग नोंदवला. पथसंचलना दरम्यान सेविकांकडून वैयक्तिक व सांघिक गीतांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. घोष व गीतांच्या तालावर परिसरात राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सेवाभावाची ऊर्जा निर्माण झाली. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून कोकण प्रांत व्यवस्था प्रमुख स्मिता आंबेकर उपस्थित होत्या. तसेच, रायगड जिल्हा कार्यवाह रुचिता काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.






