| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुरकुंडी-कोलटेंभी परिसरात बनावट कागदपत्रे आणि अधिकारांचा गैरवापर करून बेकायदेशीर माती उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सचिन जगन्नाथ पाटील यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित विभागांकडे सविस्तर फौजदारी तक्रार दाखल केली असून, भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. अलिबागच्या आमदारांनी पाळलेले लाल हे भ्रष्टाचाराचे उद्योग करीत असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अलिबागचे आमदार ज्याला आश्रय देत आहेत, तोच लाल हे बेकायदेशीर ‘उद्योग’ रेटून नेत आहे. विशेष म्हणजे, ‘माती काढणारी माणसे माझीच आहेत. तक्रारदार सचिन पाटील वेडा असून, त्याच्याकडे लक्ष देऊ नका’, असे आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितल्याचा गंभीर दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कायदा कुचकामी ठरत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असताना, कारवाईऐवजी ‘संरक्षण’ दिले जात असल्याचा आरोपही जनतेतून होत आहे.
प्रमुख घडामोडी: कागदपत्रांची फेरफार : तक्रारदाराच्या मते, गट क्र. 178/1 मधून रॉयल्टी दिल्याचे भासवले जात आहे, मात्र प्रत्यक्षात माती त्यांच्या खासगी मालकीच्या जमिनीतून काढली जात आहे. तसेच, शासकीय कागदपत्रांमध्ये बनावटगिरी करून आणि फसवणुकीच्या उद्देशाने दस्तऐवजांचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रशासकीय परवानगी आणि वास्तव : कागदपत्रांनुसार, ‘मे. स्थानिक युवा कन्स्ट्रक्शन’ (प्रो. संतोष गजानन म्हात्रे) यांना 20/03/2025 रोजी स.नं. 119/1/ब/6 मधून 2000 ब्रास माती/मुरुम काढण्यासाठी तात्पुरता परवाना देण्यात आला होता. मात्र, या परवान्याचा वापर करून अन्य क्षेत्रांत बेकायदा खोदकाम होत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
पर्यावरणाची हानी : या अनधिकृत उत्खननामुळे जमिनीचे स्वरूप बदलत असून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
प्रशासकीय मागणी : सचिन पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, हे उत्खनन तात्काळ थांबवून सक्षम अधिकाऱ्यांमार्फत जमिनीची मोजणी करण्यात यावी. तसेच, पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि बेकायदा उत्खनन करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या तक्रारीमुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि परवानाधारकांच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन आता यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेकायदेशीर उत्खननाचा आरोप
कूरकुंडी-कोलटेंभी येथील गट क्र. 178/2, 117, 119, 164 आणि 179 या क्षेत्रांतून कोणतीही शासकीय मोजणी न करता आणि रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन सुरू आहे. संतोष गजानन म्हात्रे, गणेश कडव, समीर गंगाधर पाटील व आशिष गंगाधर पाटील, संजय राजकुमार पाटील, दिलीप नंदकुमार पाटील यांनी संचिन पाटील यांच्या जागेतून उत्खनन केल्याचा आरोप सचिन पाटील यांनी केला आहे.
अवैधरित्या माती उत्खननाविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेलो असता, मातीमाफिया समीर पाटील यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठलाग केला. अखेर जिल्हाधिकारी यांना सांगून पोलिसांच्या सहकार्याने जीव वाचविण्याचा प्रत्न केला. या प्रकरणात माती उत्खनन माझ्या मालकीच्या जागेत करीत आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.
-सचिन पाटील,
तक्रारदार







