| चौल | प्रतिनिधी |
आरसीएफ, थळ येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या आरसीएफ एक्स-एम्प्लॉईज सोशल फोरमचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 18 जानेवारी रोजी अलिबाग येथील आरसीएफ वसाहतीतील कम्युनिटी हॉलमध्ये उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास सुमारे 650 सभासद पती-पत्नी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सभासदांच्या भजनी मंडळाच्या भजनाने झाली. सकाळी दहा वाजता प्रमुख पाहुणे नितीन हिरडे (कार्यपालक निदेशक, आरसीएफ थळ) यांचे सपत्नीक आगमन झाले. राष्ट्रगीतानंतर दिवंगत सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
फोरमचे अध्यक्ष रवींद्र वर्तक यांनी प्रास्ताविकात फोरमच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला व फोरमने यंदा दहा वर्षे पूर्ण केल्याची माहिती दिली. सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी 75 वर्षे पूर्ण केलेल्या सभासद पती-पत्नींचा श्री. व सौ. हिरडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे, उपस्थित महाप्रबंधक श्री. कोळी, श्री. काळबांडे, श्री. मंगेश व जनसंपर्क अधिकारी राकेश कवळे यांचे स्वागत करण्यात आले. फोरमचे ज्येष्ठ सभासद प्रदीप नाईक यांची अलिबाग नगरपरिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन हिरडे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत कंपनीच्या सर्वांगीण प्रगतीची माहिती दिली व फोरमला यापुढेही सहकार्य मिळत राहील, असे आश्वासन दिले. यानंतर प्रमुख वक्ते गणेश शिंदे यांनी ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक व्याख्यान दिले. त्यांच्या नर्मविनोदी शैलीतील भाषणास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
श्री. पानसरे यांनी पसायदान सादर केले, तर सुधीर सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश म्हात्रे यांनी केले. दुपारच्या सत्रात सभासद पती-पत्नींनी कराओकेवर आधारित हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा बोराडे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे युट्यूबवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले, त्यामुळे अनेक सभासदांना घरबसल्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला.





