24 किमीचे अंतर पोहत केले पार
| शिहू | प्रतिनिधी |
जांभूळटेप गावातील 11 वर्षीय शार्दूल भोईर याने ऐतिहासिक सागरी पोहण्याचा निर्धार करून 24 किलोमीटरचे अंतर 6 तास 21 मिनिट 21 सेकंदात पार केले आहे. शार्दूलने सोमवारी (दि.19) रात्री 2:20 वाजता करंजा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर पोहण्यास सुरवात केली. त्याच्या मेहनतीने व जिद्दीने त्याने कुठेही न थांबता 6 तास 21 मिनिट 21 सेकंदात हे अंतर पार केले. शार्दूल हा उरण एज्यूकेशन सोसायटी इयत्ता 6वी चा विद्यार्थी आहे. त्याने वयाच्या 9व्या वर्षापासून पोहण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी त्याला आई जागृती भोईर, वडील अमोल भोईर, प्रशिक्षक इंटरनॅशनल स्विमर संतोष पाटील, हितेश भोईर व सुनील पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे तो हे अंतर सहजरित्या पार करू शकला. गेट वे ऑफ इंडियाला पोहचल्यावर सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, व मान्यवरांकडून शार्दूलचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याच्या या धाडसी मोहिमेबद्दल रायगड जिल्हासह सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.






