| महाड | प्रतिनिधी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे संस्थेच्या वतीने दिनांक 19 व 20 जानेवारी रोजी समतादूत व प्रकल्प अधिकारी यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा क्रांतीभूमी महाड, जिल्हा रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे दुरुस्त प्रणालीद्वारे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विस्तार व सेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी उल्हास शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यशाळेला संबोधित करताना महासंचालक सुनील वारे म्हणाले की, महाड ही क्रांतिकारी भूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच क्रांतीभूमीत चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समता प्रस्थापित केली. तो लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कार्यशाळेचे प्रास्ताविक विस्तार व सेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड करताना त्यांनी सर्व राज्यातील प्रत्येक तालुक्यात आपले समतादूत चांगले काम करत असून समतादूतांच्या कामात गतिशीलता येण्यासाठी महाड येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या समतादूत आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेला संपूर्ण राज्यातून 300 समतादूत व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समतादूत विभागाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्वी सोनवणे, राजश्री कांबळे, प्रकाश जमदाडे, लिना कांबळे, यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन सुमेध थोरात यांनी केले. आभार रामदास लोखंडे यांनी मानले.






