विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
| माणगाव | प्रतिनिधी |
श्री जन्मोत्सव व माघी गणेशोत्सव हा कोकणात दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी विविध कार्यक्रम, जत्रोत्सव व जल्लोषामय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोकणात अनेक गणपती देवस्थाने आहेत. त्यातील एक स्वयंभू गणपती मंदिर मुगवली हे आहे.
माणगाव तालुक्यातील मुंबई- गोवा हायवेलगत मुगवली येथे असलेल्या स्वयंभू गणपती मंदिरात श्री जन्मोत्सव गुरुवार दि.22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, दरवर्षी प्रमाणे या वेळी तिथे यात्रा देखील मोठ्या प्रमाणावर भरते. तसेच येथे दरवर्षी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे व यात्रेचे आयोजन विश्वस्त व ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात येते. सकाळी श्रीमूर्ती महापुजा सोहळा, गणेश जन्म उत्सव किर्तन, गणेश जन्म, भजन, श्री गणेश यागारंभ, यागपूर्णहुती, महाआरती असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तीमय वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येतो.
कोकणात या गणेशोत्सव काळात भक्तीला उधाणच येते. गजाननाची अनेक रुपे आहेत. त्यापैकीच एक असलेल्या माणगाव जवळील मुगलीच्या गणपतीचे स्थान हे जागृत म्हणून परिचीत आहे. शिवाय भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणूनही त्याची सर्वत्र ख्याती आहे.
सुमारे 325 वर्षापूर्वी मुगवलीच्या परिसरातील एका शेतात एक शेतकरी नांगरणी करीत होता. अचानक शेतातील एका दगडास नांगराचा फाळ लागून तेथून रक्त येऊ लागले. हे पाहून त्या शेतकऱ्याने गावाकडे धाव घेऊन घडलेली सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. सर्व ग्रामस्थांनी याबाबत गोरेगावच्या जाणकारांचा सल्ला घेतला व हे गणेशाचे स्वयंभू महास्थान आहे, असे त्यांनी सांगितल्यावर ग्रामस्थांनी त्या पाषाणाभोवतालची जागा स्वच्छ केली. त्यानंतर सर्वांनाच नैसर्गिक अवस्थेतील गणेशाचे मोहक दर्शन झाले. ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या दोन फूट लांबी-रुंदीच्या पाषाणावर नैसर्गिक अवस्थेत असून, मस्तक, उभी वळलेली सोंड, पोट अशा स्वरुपाची आहे. मागील बाजूस सिंह असून, त्यास पाठ टेकून खाली पाय सोडून तो बसलेला आहे. गणेशाचे नेत्र नैसर्गिक अवस्थेत असल्यामुळे त्याचे डोळे बोलके वाटतात.
सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी सुप्तावस्थेत असलेल्या या जागृत गणेशासाठी सुरूवातीस एक कुडाचे मंदिर उभारले. त्यानंतर प्राचीन काळातील या मंदिराचा 35 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून गाभाऱ्यात संगमरवरी दगड बसविण्यात आला व मंदिरही थोडे प्रशस्त करण्यात आले. 1968 साली मुगवलीच्या स्थानिक स्वयंभू गणेश मंडळाने गणेश व्यवस्थापन समिती स्थापन करून श्रींच्या भोवती उत्तमपैकी छोटासा गाभारा बांधला आणि दररोजच्या गणेशपुजेची व्यवस्था केली. पूर्वीच्या जुन्या कौलारू मंदिराचे रुपांतर आता भव्य अशा सिमेंट काँक्रीटच्या 22 फूट रुंद व 30 फूट लांब अशा सुंदर मंदिरात झाले आहे. मंदिराचे शिखर मुंबई-महाड महामार्गावरील मुगवली फाट्याजवळूनही दिसते. येथील गणेश हा पूर्वीभिमूख आहे. त्यामुळे गणेशाच्या मूर्तींवर दररोज सूर्यकिरण पडावेत अशीही कल्पकता मंदिर बांधताना योजण्यात आली आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने हा गणपती जागृत देवस्थान म्हणून परिचीत आहे.






