| पनवेल | प्रतिनिधी |
वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघ हा नेहमीच शेतकरी कामगार पक्षाचा राहिला असून, यावेळी या मतदारसंघातून लता धनराज म्हात्रे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्या निश्चितपणे आघाडी घेऊन रायगड जिल्हा परिषदेवर निवडून जातील, असा विश्वास माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.
वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून लता धनराज म्हात्रे, वावंजे पनवेल पंचायत समिती मतदारसंघातून पराग कचरू भोपी आणि चिंधरण पंचायत समिती मतदारसंघातून बाळू गोमा वारा यांनी पनवेल तहसील कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून रॅली काढण्यात येऊन तहसीलदार कार्यालयात अर्ज भरले गेले. यावेळी काशिनाथ पाटील यांनी, पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीतील विलंबाचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी उमेदवारी प्रक्रियेत खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी आ. बाळाराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, नारायण घरत, ग्रामपंचायतीचे सरपंच धनराज म्हात्रे, तसेच वावंजे व चिंधरण मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







