| उरण | प्रतिनिधी |
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत खोके देऊन विरोधी उमेदवार खरेदी करण्यात आल्याने अनेक जागा बिनविरोध काबीज केल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप ताजा असतानाच, आता उरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही हाच घाणेरडा खेळ सुरू असल्याची जोरदार चर्चा उरणच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महानगरपालिका निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचे खोके उघडून उमेदवारांना विकत घेण्यात आले होते. पक्षाशी गद्दारी करून अनेक उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आणि समोरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या घटना अजूनही जनतेच्या स्मरणात ताज्या आहेत. त्याच ‘खोके संस्कृतीच्या’ धर्तीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. उरण जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी तब्बल 29 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 46 उमेदवार, असे एकूण 12 जागांसाठी 75 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, छाननीअंती पंचायत समितीच्या 2 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आता 73 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (दि.27) असल्याने, पुढील पाच दिवसांत ‘मतांच्या लढाईऐवजी खोके वाटपाची लढाई’ जोरात रंगणार असल्याची चर्चा आहे.







