| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या धावपटूंनी मुंबई मॅरेथॉनमध्ये ठसा उमटवला. एकीकडे मुंबईमधील बोरिवली येथील कार्तिक करकेरा याने पूर्ण मॅरेथॉन पुरुष विभागात विजेता होण्याचा मान संपादन केला, तर दुसरीकडे नाशिकच्या संजीवनी जाधव हिने पूर्ण मॅरेथॉन महिला विभागात जेतेपदावर मोहर उमटवली.
नाशिक येथील एकलव्य अकादमीचे प्रशिक्षक विजेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनात हे दोनही खेळाडू कसब आत्मसात करीत आहेत, हे विशेष. दोन्ही खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावताना नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. पुरुष विभागातील पूर्ण मॅरेथॉनमध्ये कार्तिक करकेरा याने दोन तास 19 मिनिटे व 55 सेकंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली व पहिल्या स्थानावर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय एलिट विभागात तो दहाव्या स्थानावर राहिला. याच विभागात अनिश मगर याने दोन तास 20 मिनिटे आठ सेकंदांसह शर्यत पूर्ण करताना रौप्यपदकाची कमाई केली. प्रदीप चौधरी याने दोन तास 20 मिनिटे 49 सेकंदांसह ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.
महिला विभागातील पूर्ण मॅरेथॉनमध्ये संजीवनी जाधव हिने दोन तास, 49 मिनिटे व दोन सेकंदांत शर्यत पूर्ण करताना सुवर्णपदकावर नाव कोरले. निर्माबेन ठाकूर हिचे सलग तिसऱ्यांदा मुंबई मॅरेथॉनमध्ये अजिंक्य होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. तिने दोन तास 48 मिनिटे 13 सेकंदांत शर्यत पूर्ण केली; पण तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोनम हिने दोन तास 49 मिनिटे 24 सेकंदांत शर्यत पूर्ण करीत रौप्यपदक जिंकले. कार्तिक करकेरा याने मागील मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. यंदा तो पहिल्यांदाच मुंबईतील पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता. पहिल्याच प्रयत्नात त्याला घवघवीत यश संपादन करता आले. संजीवनी जाधव हिनेही पहिल्यांदाच मुंबई पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. तिलाही दैदीप्यमान कामगिरी करता आली.







