| पनवेल | प्रतिनिधी |
सुधार अभियान अंतर्गत शिधापत्रिकांचे शुद्धीकरण मोहीम राबवली जात आहे. मोहिमेत मृत, दुबार आणि संशयास्पद लाभार्थ्यांची नावे वगळण्याचे काम सुरू आहे. पनवेल तालुक्यातही अभियानाला सुरुवात झाली असून दुबार व संशयित नावे वगळण्याची शक्यता आहे. प्राधान्य गट आणि अंत्योदय शिधापत्रिकांमधील अपात्र, मृत आणि दुबार नावे हटवणे.
पुरवठा निरीक्षक घरोघरी जाऊन आधार आणि धान्य उचलीची पडताळणी करत आहेत. राज्यातील 88 लाखांहून अधिक लाभार्थी संशयास्पद आढळले असून, त्यात 100 वर्षांवरील व्यक्तींचाही समावेश आहे. पनवेल तालुक्यात 1 लाख 9 हजार 147 लाभार्थी आहेत. त्यात 6 हजार 94 अंत्योदय आहेत. तर, 62 हजार 360 प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहेत. त्यांना स्वस्त दरात धान्य मिळत आहे. या मोहिमेमुळे खऱ्या लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे; मात्र, अनेकांचे रेशनकार्ड रद्द होण्याचे गंडांतर ओढवले आहे.
मिशन सुधार अभियानांतर्गत शिधापत्रिका शुद्धीकरण काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल.
– अश्विनी धनवे, पुरवठा अधिकारी, पनवेल






