| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील प्रसिद्ध महागणपती मंदिरात गुरुवारी (दि.22) माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भजन, कीर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाबरोबर रात्री संपूर्ण गावातून श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या पालखी मिरवणुकीत तरुण-तरुणींचा मोठा सहभाग दिसून आला. बॅन्जो पथकाच्या गाण्यांवर तरुण-तरुणींचा बेबंद बेधुंद नृत्य अविष्कार पहायला मिळाला. संपूर्ण गावात जागोजागी श्रींच्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून श्रींना पंचारतीने औक्षण करण्यात आले. श्री गणपती देवस्थानच्या विश्वस्तांसह ग्रामस्थ व पाहुणे मंडळीसह सर्वांनी विशेष सहकार्य करून श्रींच्या जन्मोत्सवाचा व पालखी मिरवणुकीचा आनंद घेतला.






