| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
खारपाडा येथे अन्वी व मायरा घरत यांच्या बोरन्हाण कार्यक्रमानिमित्त नुकताच हळदी-कुंकू सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम केवळ एक धार्मिक विधी न ठरता, सामाजिक परिवर्तनाचा एक नवा वस्तुपाठ ठरला आहे. पारंपरिक चौकटी मोडीत काढत या कार्यक्रमात विधवा व विभक्त महिलांना प्रथम प्राधान्य देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, चमत्कारामागील विज्ञान उपक्रम घेण्यात आला. त्यामुळे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांचे प्रबोधनात्मक सत्र या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. त्यांनी ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या विषयावर महिलांशी संवाद साधला. केवळ भाषणावर न थांबता गायकवाड यांनी प्रत्यक्ष चमत्कार सादरीकरण प्रयोग करून दाखवले. पाण्याने दिवा पेटवणे, हवेतून वस्तू काढणे, लिंबातून रक्त काढणे, पेटता कापूर हातावर ठेवणे यांसारख्या तथाकथित चमत्कारांमागे कोणते विज्ञान दडलेले असते, हे त्यांनी प्रयोगांद्वारे सिद्ध केले. तसेच, भोंदू बाबांच्या थापांना बळी न पडता महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत, मालती म्हात्रे, भीमाबाई घरत व निर्मला कृष्णा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. हा संपूर्ण उपक्रम रमाकांत घरत व त्यांच्या संपूर्ण घरत कुटुंबाने यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक विषमतेवर प्रहार
घरत कुटुंबियांनी एक धाडसी व विधायक पाऊल उचलले आहे. समाजात अनेकदा विधवा किंवा विभक्त महिलांना शुभ कार्यात दुय्यम स्थान दिले जाते. मात्र, या अनिष्ट प्रथेला छेद देत अशा महिलांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे आमचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.






