दहशत निर्माण करणाऱ्यांना जनताच जागा दाखविणार
| रायगड| जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघातील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवार पूजा अजित भगत यांना ठाकरे गटातील उमेदवार छाया पिंगळे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. छाया पिंगळे यांनी स्वतःचा अर्ज मागे घेऊन त्यांनी भगत यांना पाठिंबा दर्शविला आहे. मंगळवारी सायंकाळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची भेट घेऊन पूजा भगत यांना निवडून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेणार असल्याचे आश्वासन दिले. शेकापने केलेल्या विकासकामांमुळे या निवडणुकीत पूजा भगत भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास छाया पिंगळे यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. शेकाप, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराला वेग आला आहे. अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात मंगळवारी (दि. 27) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. ठाकरे गटातील शिवसेनेच्या उमेदवार छाया पिंगळे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची त्यांनी भेट घेऊन ही निवडणूक नक्की जिंकणार असा विश्वास दिला. यावेळी छाया पिंगळे म्हणाल्या की, वरिष्ठांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला आहे. शेकापकडून एक उच्च शिक्षित उमेदवार दिला आहे. सुशिक्षित उमेदवार या परिसरात मिळाल्याने त्यांच्या विजयाने या भागात एक चांगला बदल होईल, असा विश्वास आहे.
सध्या आंबेपूरसह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मतदार, विशेषतः महिला मतदारांना धमकावून मत मिळवण्याचा प्रयत्न होतोय, असे दिसून आले आहे. या त्रासाला जनता आपली जागा दाखवून देईल आणि महाविकास आघाडी एकनिष्ठतेने काम करुन दहशतीवर आळा बसेल, असा विश्वासही पिंगळे यांनी व्यक्त केला.







