। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, नेरळ जिल्हा परिषद गटात अनुसूचित घटना घडली आहे. नेरळ गावातील ममदापूर नाक्यावर तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणावर चाकू हल्ला केला आहे. दरम्यान या प्रकरणी दोघांना नेरळ पोलिसांनी अटक केली असून, नेरळ पोलीस ठाण्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नेरळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता टोकरे यांचे पती रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ममदापूर नाक्यावर कार्यकर्त्यांसह होते. तेथे ममदापूर गावातील धनेश शिंगे आणि सुरेश टोकरे यांच्यात काही शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले विशाल हिसाळके हा तेथून बाजूला गेला आणि काही वेळाने टोकरे हे देखील पुढे निघून गेले. त्यानंतर टोकरे आणि धनेश शिंगे यांच्यातील चर्चेची माहिती धनेश हे आपल्या गावातील सहकारी विशाल हिसाळके यांना सांगत होता. त्यावेळी विशाल हे बरोबर आहे बरोबर आहे हे पुटपुटत असताना मिलिंद शिंगे याने तेथे येऊन तू काय बरोबर आहे बरोबर असे बोलत आहे असा प्रश्न विशाल हिसाळके यांना केला. त्यावेळी मिलिंद याने विशाल यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर तेथे असलेले ममदापूर गावातील कार्यकर्ते रेशब कुरेशी आणि अरमान पटेल या दोघांनी देखील विशाल यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मिलिंद शिंगे याने जवळच पार्क केलेल्या आपल्या दुचाकी गाडी मधील चाकू आणला. त्या चाकूने मिलिंद शिंगे हा विशाल यांच्यावर वार करू लागल्याने धनेश शिंगे याने विशाल वरील चाकूहल्ला वाचवण्याचा प्रयत्न केला. धनेश याने केलेले चारही चाकू हल्ले विशाल पासून चुकवले. त्यानंतर मिलिंद शिंगे सोबत असणारे रेषब कुरेशी आणि अरमान पटेल या दोघांनी विशाल यांच्यावर चाकू हल्ला केला. या चाकूच्या हल्ल्यात विशाल हिसाळके यांच्या पोटात मोठी जखम झाली असून, मध्यरात्री दीड वाजता त्यांना रायगड हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.
नेरळ पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावली असून, या टीमकडून घटनास्थळ असलेल्या ममदापूर टिवाले हॉटेल आणि दिव्यादीप हॉटेल येथे पाहणी केली. जिल्हा पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्याकडून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. नेरळ पोलिसांकडून जखमी विशाल यांचा जबाब नोंदवून घेण्याची कार्यवाही सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीला रंग चढला असून रक्तरंजित निवडणूक होण्याच्या मार्गावर आहे.






