शेकडो महिलांच्या हाताला रोजगार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
चविष्ट, रुचकर आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असा अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध पांढरा कांदा आता काढणीस तयार झाला असून, शेतकऱ्यांमध्ये काढणीची लगबग सुरू झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, सागाव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर कांदा काढणीचे काम सुरू असून या प्रक्रियेमुळे गावासह परिसरातील शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कांदा काढणीपासून ते कांद्याच्या माळा तयार करण्यापर्यंत विविध टप्प्यांमध्ये महिलांच्या हाताला काम मिळू लागले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याच्या माळी तयार होऊन त्या बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, वाडगावआदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाल्याची माहिती समोर आली आहे. भात कापणीची कामे पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कांद्याची लागवड करण्यात आली होती. आता हा पांढरा कांदा पूर्णपणे तयार झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून काढणीला वेग आला आहे.

कांदा काढणीबरोबरच त्याचे सुकविणे आणि माळा तयार करण्यासाठी स्थानिक कामगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे. विशेषतः महिलांसाठी हे रोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरत असून, मार्च महिन्यापर्यंत शेकडो जणांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी एक ते दोन एकर क्षेत्रात तर काहींनी दोन ते तीन गुंठे क्षेत्रात कांद्याची लागवड केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी घराशेजारी परसबाग म्हणूनही कांदा घेतला आहे.
सध्या कांदा काढणीचे काम जोरात सुरू असून, काढलेला कांदा सुकवून त्याच्या माळी तयार करण्याचे कामही समांतरपणे केले जात आहे. अलिबागचा पांढरा कांदा चविष्ट आणि गुणधर्मयुक्त असल्यामुळे त्याला राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठी मागणी असते. रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांबरोबरच परदेशातूनही या कांद्याला मागणी आहे. विशेष म्हणजे, अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला सौदी अरेबियातून मागणी आल्याची माहिती असून, एक कंटेनर कांदा निर्यातीसाठी मागविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
अलिबागचा पांढरा कांदा स्थानिक ग्राहकांसह पर्यटकांच्या कायमच पसंतीला उतरतो. सध्या कांदा काढणीला सुरुवात झाली असून, रायगड जिल्ह्यातील मुरूडसह परदेशातून, विशेषतः सौदी अरेबियातून कांद्याला मागणी आली आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. कांदा काढणी, सुकविणे आणि माळा तयार करण्याच्या कामामुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कांदा बाजारात दाखल होईल. यंदा कांद्याला चांगला दर मिळेल, असा विश्वास वाटत आहे.
-सतीश म्हात्रे,
कांदा उत्पादक शेतकरी, कार्ले






