स्थलांतरित मतदारांवर उमेदवारांची भिस्त; मनधरणीसाठी जोरदार हालचाली
| पाली / बेणसे | धम्मशील सावंत |
मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या सीमेवर वसलेल्या रायगड जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोटापाण्यासाठी कामानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या मतदारांवर यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची विशेष भिस्त आहे. या स्थलांतरित मतदारांची संख्या लक्षणीय असून, त्यांचा मतदानातील सहभाग एखाद्या उमेदवाराच्या विजयावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळेच सर्वच पक्षांचे उमेदवार, राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते सध्या या मतदारांच्या संपर्कात राहण्यावर भर देताना दिसत आहेत.
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमधील तरुण, कामगार, कुटुंबप्रमुख रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. मात्र, मतदार नोंदणी मूळ गावीच असल्याने निवडणुकीच्या काळात हेच मतदार निर्णायक ठरतात. ही बाब लक्षात घेऊन उमेदवारांकडून स्थलांतरित मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बूथनिहाय मतदार यादी तपासून कोणता मतदार कुठे स्थलांतरित झाला आहे, याची माहिती संकलित केली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, त्या मतदारांशी थेट संपर्क साधून मतदानासाठी गावी येण्याची विनंती केली जात आहे. ज्यांचा थेट पत्ता किंवा संपर्क क्रमांक मिळत नाही, अशा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचा आधार घेतला जात आहे. ‘आपण तुमच्या संपर्कात आहोत, आम्हाला विसरू नका,’ अशा स्वरूपाचा संदेश देण्यासाठी कबड्डी, क्रिकेट स्पर्धा, सामाजिक कार्यक्रम आणि छोट्या मेळाव्यांचा आधार घेतला जात आहे. काही ठिकाणी स्वतः उमेदवारही स्थलांतरित मतदारांच्या भेटीगाठी घेत असल्याचे चित्र आहे.
स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी गावी आणणे ही मोठी कसरत मानली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा मतदानाच्या दिवशी या मतदारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणावरून गावी आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था, येण्या-जाण्याची सोय, भोजनाची व्यवस्था तसेच पुन्हा सुरक्षितपणे कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे प्रयोजन केले जात असल्याचे बोलले जात आहे. या सर्व हालचालींमुळे रायगडच्या राजकारणात स्थलांतरित मतदार हे केंद्रस्थानी आले आहेत.
विशेष म्हणजे, रायगड जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून, अनेक आदिवासी वाड्या-पाड्यांतील नागरिकही कामानिमित्त जिल्ह्याबाहेर स्थलांतरित झाले आहेत. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात होणारे हे स्थलांतर लक्षात घेऊन सध्या आदिवासी मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यांना मतदानासाठी आणण्यासाठी त्यांच्या कामाची, राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. एकूणच, स्थलांतरित मतदारांचा सहभाग किती होतो, यावर रायगड जिल्ह्यातील निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार असून, त्यामुळेच सर्वच पक्षांकडून या मतदारांसाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मतदार नोंदणी गावी असल्यामुळे मतदानासाठी गावी जाणे आवश्यक आहे. उमेदवारांचे कार्यकर्ते संपर्कात असून, येण्या-जाण्याची सोय सांगितली आहे. मतदान हा आपला हक्क असल्यामुळे जाण्याचा प्रयत्न करणार आहे.
-स्थलांतरित मतदार
(मुंबईत कार्यरत कामगार)
स्थलांतरित मतदारांचा टक्का मोठा आहे. त्यांना मतदानासाठी आणणे आव्हानात्मक असले तरी नियोजन सुरू आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.
-स्थानिक राजकीय कार्यकर्ता
कामासाठी बाहेर गेलो असलो तरी मतदानासाठी गावी बोलावले जात आहे. येण्याची सोय केली तर आम्ही नक्की मतदान करणार आहोत.
-आदिवासी वाडीतील नागरिक
पूर्वी गावातच मतदान होत असे. आता लोक बाहेर गेल्यामुळे निवडणुकीचे स्वरूप बदलले आहे. स्थलांतरित मतदारांचा कौलच निकाल ठरवेल.
-ज्येष्ठ नागरिक







