| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वदप ग्रामपंचायत हद्दीतील कुशीवली येथील शेतजमिनीवर शेजारील एआय युनिव्हर्सिटी (पूर्वीचे नाव युनिव्हर्सल बिझनेस स्कूल) येथून येणाऱ्या सांडपाण्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. येथील शेतकरी वनिता पंढरीनाथ भोईर यांच्या सर्व्हे नंबर 21/1/इ येथील शेतीवर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कॉलेजचे सांडपाणी थेट पसरत आहे.
युनिव्हर्सिटीकडून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली नसल्याने शेजारील शेतजमीन पूर्णपणे बाधित झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पीक घेणेही अशक्यप्राय झाले आहे. शेताला लागूनच कालवा असूनही या पाण्याचा वापर करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून शेतकरी, स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. महसूल, पोलीस व शिक्षण विभाग यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. हे कॉलेज बड्या लोकांचे असल्याने प्रशासन मेहेरबान आहे अशी भावना स्थानिक ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
एआय युनिव्हर्सिटी ही एमबीए शिक्षण देणारी संस्था असून ती यापूर्वीही विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विद्यार्थ्यांच्या कथित गैरवर्तनाबाबत तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत अनेकदा तक्रारी झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत तहसीलदारांकडे पत्रव्यवहार केला जाणार असून, न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक ग्रामस्थ मनोज भोईर यांनी या परिस्थितीबद्दल खेद व्यक्त केला आहे. तर बाधित शेतकरी पुंडलिक भोईर यांनी न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आदित्य भोईर यांनी युनिव्हर्सिटीला ड्रेनेज व्यवस्था नसताना परवानगी नसताना परवानगी कशी मिळाली, असा महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.






