। कर्जत । प्रतिनिधी ।
हुमेरा फाऊंडेशन ट्रस्ट संचलित शारविल स्कूल ऑफ एक्सलन्स, नेरळ यांचा वार्षिक स्नेहसंमेलन तस्वीर हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. नेरळ येथील हाजी मुजाहिद खोत सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गायन व विविध समूह सादरीकरणांद्वारे आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते एका नटाने सादर केलेले गोविंदाचे नृत्य. दहीहंडी, कृष्णलीला आणि पारंपरिक ताल-लयीत साकारलेल्या या नृत्याने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले. टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी उभे राहून या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई आयकर/जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तारीक मबूद तसेच डॉ. अम्ब्रिश दुबे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक करत, अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो व व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन हुमेरा फाऊंडेशनचे अध्यक्ष मुजाहिद खोत, सचिव अब्दुल रऊफ खोत तसेच शारविल स्कूल ऑफ एक्सलन्सच्या प्राचार्या मीना अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टी आत्माराम खंडागळे, उज्वला पाटील, सुशीला अनंत रमण, सय्यार खोत, नियोजन प्रमुख किशोरी शेळके व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.







