| शिहू | प्रतिनिधी |
सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, वादे-प्रतिवादे, आरोप-प्रत्यारोपाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदार संघात गाव बैठकी, प्रचार फेऱ्या, मतदारांच्या भेटीगाठी घेण्याकडे जास्त भर देत आहेत. अशातच पेण तालुक्यातील शिहू जिल्हा परिषद गट हा प्रतिष्ठेचा समजला जातो. या शिहू जिल्हा परिषद गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पल्लवी प्रसाद भोईर व पंचायत समिती उमेदवार संजय धाया भोईर यांचा शिहू, झोतिरपाडा, बेणसे, कुहीरे भागात जोरदार प्रचार करण्यात आला. झोतिरपाडा येथील ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत कुथे यांच्या निवासस्थानी झालेल्या संवाद मेळाव्यात बोलताना पंचायत समिती उमेदवार संजय भोईर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना संजय भोईर म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य माणसावर टीका करण्यात आली की, मी तीनदा निवडणूक लढवली, जरी मी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असलो तरी, जनतेच्या आशीर्वादाने याही वेळी मी भरघोस मतांनी निवडून येईन. आमचे कार्य पारदर्शक आहे, त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत नाही. येणाऱ्या 7 तारखेला जनता तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवील. मी एक सामान्य माणूस तुम्हाला आव्हान देतो जनतेचा सरपंच किंवा सदस्य होऊन दाखवा, असे चोख प्रत्युत्तर यावेळी बोलताना संजय भोईर यांनी दिले आहे.
या संवाद मेळाव्यात शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रसाद भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत कुथे, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, माजी जिल्हा संघटिका सुनीता खाडे, लक्ष्मण खाडे, चंद्रकांत अडसूळे, अशोक भोय, मोहन पाटील यांसह शिवसैनिक, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






