| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड जंजिरा प्राथमिक आरोग्य केंद्र व मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयातील एन.एस.एस. युनिट 10 व डिएलएलईच्या वतीने सिकलसेल सॉल्युबिलिटी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या 52 विद्यार्थीनींनी सॉल्युबिलिटी तपासणी केली.
यावेळी एनएसएस युनिट 10 चे प्रमुख डॉ. श्रीशैल भैरगुंडे, तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैशाली पाटील, औषधनिर्मिता अधिकारी प्रसाद सुर्वे, आरोग्य सेविका रेश्मा साळवी, डॉ. नारायण बागुल, डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. सीमा नाहीद, प्राध्यापक गजानन मुनेश्वर, प्राध्यापक रुपी हसवारे, प्राध्यापक सिध्देश सतविडकर, प्रा. प्रणव बागवे, प्रा. मुस्कान रजब आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.
तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा यांनी सिकलसेल सॉल्युबिलिटी आजाराविषयी सविस्तर माहिती आणि त्याची लक्षणे सांगितली. ते म्हणाले की, सिकलसेल हा लाल पेशीमध्ये होणारा आजार आहे. सिकलसेल रुग्णांमध्ये रक्तक्षय कमी असणे, अशक्तपणा, हातापायावर सुज येणे, कमरेची व सांधेदुखी काविळ पक्षघात पित्ताशय न भरून येणाऱ्या जखमा, मूत्रपिड निकामी होणे, डोळ्यावर परिणाम होणे, असह्य वेदना, जंतुसंसर्ग, शारीरिक त्रास मानसिक त्रास होतो. तसेच, सिकलसेल सॉल्युबिलिटी टेस्ट ही सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे केली जाते. तरी रुग्णांनी यांचा फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा यांनी केले.






