| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 7 फेब्रुवारी 2026 पासून क्रिकेटमधील सर्वात मोठा महासंग्राम म्हणजेच टी-20 विश्वचषक 2026 ला सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत 20 संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार असून, उपविजेत्या संघाचीही चांदी होणार आहे.
आयसीसीने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, विविध अहवालांनुसार यंदाची एकूण बक्षीस रक्कम 13.5 दशलक्ष असण्याचा अंदाज आहे. 2024 च्या विश्वचषकाच्या तुलनेत यंदा बक्षीस रकमेत 20% वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम केवळ अंतिम फेरीतील संघांनाच नाही, तर सहभागी होणाऱ्या सर्व 20 संघांना त्यांच्या कामगिरीनुसार वाटली जाणार आहे. 20 संघ सहभागी होत असल्याने अफगाणिस्तान, अमेरिका आणि आयर्लंड सारखे संघ मोठ्या देशांना धक्का देण्यासाठी सज्ज आहेत. मैदानातील ट्रॉफीच्या लढाईसोबतच या छप्परफाड बक्षीस रकमेमुळे खेळाडूंमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
भारत आणि श्रीलंकेत रंगणार थरार
2026 चा टी-20 विश्वचषक अधिक भव्य करण्यासाठी आयसीसीने विशेष प्रयत्न केले आहेत. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा 8 मार्च 2026 रोजी अंतिम सामन्याने संपेल. पूर्ण स्पर्धेत एकूण 55 सामने खेळले जातील. विशेष म्हणजे, भारतीय संघ या स्पर्धेत ‘गतविजेता' म्हणून मैदानात उतरणार असल्याने जगभरातील चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर खिळल्या आहेत.
बक्षीस रकमेचे अंदाजित स्वरूप (भारतीय रुपयांत)
कामगिरीनुसार पुरस्काराची अशी असणार रक्कम (भारतीय रुपये)
विजेता संघ सुमारे
27.48 कोटी रुपये
उपविजेता संघ सुमारे 14.65 कोटी रुपये
उपांत्य फेरीतील पराभूत संघ (प्रत्येक संघाला) सुमारे 7.24 कोटी रुपये
5 व्या स्थानावरील संघ (प्रत्येक संघाला) सुमारे 3.48 कोटी रुपये
13 व्या स्थानावरील संघ (प्रत्येक संघाला) सुमारे 2.29 कोटी रुपये







