व्यापाऱ्यांवर कडक नजर
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशवी विक्रीवर प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नियमानुसार कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर कडक निर्बंध घालण्याकरीता दुकानदारांना याआधी नोटीसा बजाविण्यात आल्या असून जनजागृतीच्या माध्यमातून सुद्धा पालिका प्रशासनाने नागरिकांना प्लास्टिक पिशवी वापरू नये, असे आव्हान करण्यात आले होते. त्याचबरोबर पालिकेने धडक कारवाई सुरु ठेवल्याने पालिका क्षेत्रातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार होण्याच्या मार्गावर असून शहराची प्लास्टिक मुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
काही प्लास्टिक पिशव्या अत्यंत पातळ असतात, ज्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करताना अनेक अडचणी येतात. या प्लास्टिक पिशव्यांचा कचरा जगाची सर्वात मोठी समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत. शिवाय हा कचरा हटवणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. प्लास्टिक पिशव्यांचा हा कचरा इकडून नेऊन दुसरीकडे टाकला तरी तो नष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्याचे ढीग वाढतच आहेत.
प्लास्टिक पिशव्या येण्याआधी माणूस वस्तू ठेवण्यासाठी प्राणीजन्य पदार्थांपासून बनवलेल्या पिशव्या किंवा आवरणांचा वापर करत होता. प्राणीहत्या थांबवण्यासाठी आणि सोयीसाठी प्लास्टिक पिशव्या वापरात आल्या. मंडई परिसरात अनेक छोट्या विक्रेत्यांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांमधून मालाची विक्री केली जात होती. शहरात मोठ्या संख्येने किरकोळ विक्रेते फळविक्री करतात. बहुतांश किरकोळ विक्रेते आणि फेरीवाले हे सर्रासपणे मान्यता नसलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ग्राहकांस देत होते. त्यामुळे कचऱ्याचा, गटार तुंबण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला होता. यासाठी पालिकेच्या पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.
नागरिकांनी कुठल्याही विक्रेत्याकडून प्लास्टिक पिशव्या न घेता पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी आणि अशा पिशव्या कुठल्या विक्रेत्याकडे आढळून आल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाबरोबर संपर्क साधून स्वच्छ, सुंदर पनवेल शहरासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
– मंगेश चितळे,
आयुक्त, पनवेल महानगरपालिका.






