भाजपच्या चित्रा पाटील, सवाई पाटील यांचा दारुण पराभव
| अलिबाग | प्रतिनिधी |
खारेपाटातील मतदारांनी यावेळी कमळाला केवळ नाकारले नाही, तर ते अक्षरशः उखडून फेकल्याचे निकालातून ठळकपणे समोर आले. निवडणुकीपूर्वी भाजपने आंबेपूर आणि शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी ताकद लावत कमळ फुलविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. स्थानिक पातळीवर प्रचार, शक्तिप्रदर्शन, रणनीती यांचा जोर लावला गेला. मात्र मतमोजणीच्या दिवशी समोर आलेल्या आकडेवारीने भाजपच्या अपेक्षांवर पाणी फेरले. खारेपाटातील मतदारांनी भाजपला स्पष्ट आणि ठाम संदेश देत कमळ कोमेजल्याचे चित्र उभे केले.
आंबेपूर मतदारसंघात तिहेरी लढत रंगली होती. या लढतीत भाजपला विजयाची मोठी आशा होती. परंतु, खारेपाटातील मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला जवळपास साडेचार हजार मतांनी पराभूत करत धक्कादायक निकाल दिला. हा पराभव केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून, मतदारांनी व्यक्त केलेला स्पष्ट रोष म्हणून पाहिला जात आहे.
शहापूर मतदारसंघातही भाजपला मोठी अपेक्षा होती. येथे भाजपच्या सवाई पाटील यांचा तब्बल साडेसहा हजार मतांनी दारुण पराभव झाला. एवढ्या मोठ्या फरकाने झालेला पराभव हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही मतदारसंघांतील निकाल पाहता खारेपाटातील मतदारांनी कमळाला सपशेल नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने केलेले सर्व प्रयत्न, आखलेल्या रणनीती आणि स्थानिक पातळीवरील गणिते मतदारांनी धुडकावून लावल्याचे या निकालातून दिसून येते. खारेपाटातील हा निकाल आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.







