ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर उगारल्या तलवारी
| अलिबाग | प्रतिनिधी |
चौल येथे शिंदे गटाच्या विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीदरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. चौल-तुलाडदेवी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेसमोर मुद्दाम फटाके फोडण्याच्या प्रयत्नावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी चाकू, सुरे, तलवारी आणि काठ्या उगारल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे कार्यकर्ते नितीन दिलीप राऊत आणि हर्षल काशिनाथ नाईक यांनी मिरवणुकीदरम्यान या ठिकाणी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी फटाके फोडू नयेत, अशी विनंती यापूर्वीच करण्यात आली होती. तरीदेखील त्यांनी मुद्दाम फटाके लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना रोखण्यात आले. याच कारणावरून दोन्ही गटांत बाचाबाची सुरू झाली.
वाद वाढत गेल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चाकू, सुरे, तलवारी आणि काठ्या हातात घेतल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची माळ बाजूला फेकून दिल्याचे सांगितले जाते. वारंवार विनंती करूनही फटाके फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळेच वाद चिघळल्याचे बोलले जात आहे.
घटनेदरम्यान विद्धेश माळी हा 40 ते 50 तरुणांना घेऊन मारामारीच्या उद्देशाने आल्याचीही चर्चा आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रेवदंडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे चौल परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.







