| खोपोली | प्रतिनिधी |
लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. टेकटीवर फिरताना पाय घसरून तो सुमारे 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (दि.8) घडली असून प्रज्वल वसंत गिरी (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्रज्वल रविवारी आपल्या नातेवाइकांसोबत कारने मुंबईहून पुण्याकडे येत होता. प्रवासादरम्यान नाश्ता करण्यासाठी सर्वजण लोणावळ्यात थांबले होते. यावेळी ‘टेकडीवरून फिरून येतो’ असं सांगून प्रज्वल आणि त्याचा मावसभाऊ बाजूला गेले. मात्र, टेकडीवर फिरत असताना अचानक पाय घसरला आणि प्रज्वल सुमारे 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळला. यात त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रज्वल पुण्यात बीएड करत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या तरुणाच्या अशा मृत्यूने पर्यटनाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






