कोरोनाचा धोका वाढला; ऑस्ट्रियामध्ये पूर्ण लॉकडाउन
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोना आटोक्यात येण्याचे समाधान उपभोगत असतानाच, पुन्हा एकदा जागतिक पातळीवर टाळेबंदीचे संकेत मिळू लागले आहेत. कारण कोरोनाचे थैमान पुन्हा एकदा सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियामध्ये पूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
दिवसागणिक कोरोना संख्येचा विक्रम गाठत असल्यामुळे ऑस्ट्रियामध्ये संपूर्ण टाळेबंदीपासून ते नेदरलँड्समधील आंशिक टाळेबंदीपर्यंत अनेक युरोपीय सरकारांनी निर्बंध पुन्हा लादण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय जर्मनी, झेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकियाच्या काही भागांमध्ये लसीकरण न केलेल्यांवर निर्बंध आहेत. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानेही लवकरच सावध होऊन काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.
ऑस्ट्रिया करोना विषाणूच्या नवीन लाटेला तोंड देण्यासाठी पूर्णपणे टाळेबंदी पुन्हा एकदा लादली जाणार आहे. ऑस्ट्रिया हे असे करणारा पश्चिम युरोपमधील पहिला देश बनेल. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सर्वत्र कडक टाळेबंदी होती. जवळपास 5 महिन्यांच्या पहिल्या फेजनंतर सरकारने काही आस्थापनांसाठी नियम शिथील केले. सध्या जगातील विविध देशांमध्ये कोरोना कमी झाल्याचं दिसत आहे. भारतात परिस्थिती आवाक्यात येत आहे. मात्र चीनमध्ये कोविडचा उद्रेक पुन्हा वाढलाय. तर, फ्रान्समध्ये कोरोना नुकताच नियंत्रणात येत आहे. अशातच जगातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट आली आहे. यामध्ये युरोपला मोठा फटका बसतोय. युरोप पुन्हा एकदा महामारीचा केंद्रबिंदू बनला आहे. जगातल्या रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मी रुग्णसंख्या तसेच मृत्यू युरोपतले आहेत. संक्रमणाच्या चौथ्या लाटेने युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत आणले आहे.