| नवी मुंबई | प्रतिनिधी |
19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता आयपीएल 2026 पूर्वी एका मोठ्या स्पर्धेत धमाका करण्यास सज्ज झाला आहे. 16 संघांचा सहभाग असलेल्या प्रतिष्ठित डी.वाय. पाटील टी-20 स्पर्धेत वैभव खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 175 धावांची झंझावाती खेळी करून वैभवने मसामनावीरफ किताब पटकावला होता. संपूर्ण स्पर्धेत 496 धावांसह तो अव्वल स्थानी राहिला. तत्पूर्वी, आपल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे 2025 मध्ये वैभव हा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केला जाणारा क्रिकेटपटू ठरला होता. अवघ्या 14 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्यापूर्वीच इतकी लोकप्रियता मिळवणारा तो गेल्या दशकातील एकमेव खेळाडू ठरला आहे. सूर्यवंशी 23 फेब्रुवारीपासून नवी मुंबईत सुरू होणाऱ्या डी.वाय. पाटील स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. या स्पर्धेत डी.वाय. पाटील अकादमीचे दोन संघ सहभागी होतात, ज्यापैकी एका संघातून वैभव मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. सध्या तो तळेगाव येथे राजस्थान रॉयल्सच्या सराव शिबिरात आयपीएल 2026 ची तयारी करत आहे. आयोजकांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवला कोणत्या संघात स्थान द्यायचे यावर सध्या चर्चा सुरू आहे. आयपीएलपूर्वी तो या स्पर्धेत खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.






