| मुंबई | प्रतिनिधी |
क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादाबाबत स्मृतीचा बालमित्र असल्याचा दावा करणारा निर्माता अभिनेता विज्ञान मानेला पलाश याच्याबाबतच्या कथित बदनामीकारक, आक्षेपार्ह विधाने करण्यापासून उच्च न्यायालयाने नुकतीच मनाई केली. विज्ञान मानेने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पलाशविरुद्ध बदनामीकारक भाष्य केले होते. पलाशने विज्ञानविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, व्यावसायिक वादातून विज्ञानने त्याच्यासह कुटुंबाविरुद्ध बदनामीकारक विधाने केल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणे त्याबद्दल नुकसानभरपाई आणि आक्षेपार्ह विधाने करण्यापासून कायमस्वरूपी मनाईचे आदेश देण्याची मागणी केली होती. याचिकेची न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने गंभीर दखल घेतली. विज्ञानने केलेल्या टिप्पण्या प्रथमदर्शनी बदनामीकारक असल्याचे नमूद करून पलाशला अंतरिम दिलासा दिला. तसेच, अशा टिपणीमुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकते, असेही पलाशला पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम दिलासा देताना न्यायालयाने नमूद केले.







